भुईकोट किल्ला / Ahmednagar Fort

भुईकोट किल्ला


आदिलशाही, कुतूबशाही, हैद्राबादची निजामशाही आदीविरुद्ध बहामनी सेनेचं आक्रमण थोपविण्याची जबाबदारी अहमद निजामशहावर पडल्यानंतर आपल्या अतुलनीय शौर्यानं ज्या ठिकाणी बहामनी सेनेला धूळ चारून विजय मिळविला तो गर्भगिरी पर्वत रांगांलगतचा हा निसर्गरम्य प्रदेश.
नगरच्या भुईकोट किल्ल्याला प्राप्त झालेलं सामरिक महत्त्व तेव्हापासून आजतागायत टिकून आहे. एक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी. टेकडय़ांमुळे बुरुजांवर तोफा डागणं अशक्य त्यामुळे किल्ल्याची अभेद्यता वाढली. वर्तुळाकार असलेल्या किल्ल्याला २२ बुरूज आहेत. अहमद निजामशहानं आपल्या कर्तबगार, मुत्सद्दी प्रधान, सेनापती आदींची नावं बुरुजांना देऊन त्यांचा सन्मान केल्याचं दिसून येतं. तटबंदीच्या आतील बाजूस एकूण सहा राजमहाल होते.सोनमहल, मुल्क आबाद, गगन महल, मीना महल, बगदाद महल, अशी त्यांची नावं. इमारतींच्या मध्यभागी एक मदरसाही बांधला होता. या मदरशातच राजघराण्यातील मुलांचं शिक्षण होत असे. दिलकशाद, हबशीखाने अशा इतर वास्तूंची निर्मिती गरजेप्रमाणे होत गेली. छोटेखानी गावच किल्ल्याच्या तटबंदीआड वसलं होतं. या साऱ्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून चार मोठय़ा विहिरीही खोदण्यात आल्या. गंगा, यमुना, मछलीबाई, शक्करबाई अशी त्यांची नावं होती. आता या विहिरींचं आणि महालांचं अस्तित्व दिसत नाही. ‘कोटबाग निजाम’ आणि आसपासच्या इतर देखण्या वास्तूंमुळे येथे वैभवशाली नगरी वसली. त्या काळी या नगरीची तुलना बगदाद, कैरोसारख्या तत्कालीन सुंदर नगरांशी झाल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. निजामशाही, मोगलाई, पेशवाई, ब्रिटिश अशा अनेक राजवटी या किल्ल्यानं अनुभवल्या. राजवटीनुरूप या वास्तूच्या जडणघडणीतही बदल घडले. निजामांनी किल्ल्यात वास्तव्य केले. मोगलांनी किल्ल्याचा सामरिक वापर केला. तर ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर कारागृह आणि दारूगोळा निर्मिती केंद्र म्हणून केला.

एक मैल ८० यार्ड परिघ असलेला हा किल्ला आशिया खंडातील मोठय़ा किल्ल्यांपैकी अग्रक्रमावर असलेला किल्ला, सर्व बाजूंनी खोल खंदक, खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकडय़ा यामुळे सहजासहजी शत्रूच्या दृष्टिपथात न येण्यासारखी या किल्ल्याची बांधणी आहे.

इतिहासातील अनेक कडूगोड स्मृती ‘कोटबाग निजाम’ने आपल्या उदरात सामावून ठेवल्या आहेत. कधी या किल्ल्याने तत्कालीन परदेशी मुस्लिमांच्या शिरकाणाने प्रचंड नरसंहार अनुभवला. तर कधी फंदफितुरीची अनेक कारस्थानं इथंच शिजली. अनेकदा भाऊबंदकीची नाटय़ं घडली. अनेकदा शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने अनुभवले. कित्येकदा किल्ल्याला वेढा पडून तहाचे प्रसंग उठवले. जिथे सुलताना चाँदच्या शौर्याचा दिमाख इथल्या शिळांनी अनुभवला तिथेच चाँदच्या भीषण हत्येचा साक्षीदार याच पाषाणचिरांना व्हावं लागलं. मोगलांनी किल्ला सर करण्यासाठी जंगजंग पछाडलं, तर पेशव्यांनी बंदुकीची गोळीही न उडविता मुत्सुद्देगिरीने किल्ला काबीज केला. किल्ल्यासाठी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले.
िहदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याचे सामरिकदृष्टय़ा असलेलं महत्त्व ते जाणून होते. त्याहीपेक्षा आपल्या वाडवडिलांची कर्मभूमी असल्याने हा किल्ला आपल्या अमलाखाली असावा, असं शिवाजी महाराजांना नेहमी वाटत असे. महाराजांच्या सैन्यानं हा प्रांत तीन वेळा लुटला यावरून इथल्या सुबत्तेची कल्पना येते. मोगलांचा किल्लेदार मुफलत खान याने सर्व संपत्ती किल्ल्यात आणून ठेवल्याने मराठी सैन्याच्या हाती फारसं काही लागलं नाही. किल्लाजिंकणं ही शिवाजी महाराजांची मनीषाही अपूर्णच राहिली.
सुलताना चाँदच्या हत्येनंतर सन १६०० मध्ये पहिल्यांदा हा किल्ला मोघलांच्या ताब्यात गेला. पुढे मोघलांचा सरदार कवी जंग याला वैयक्तिक जहागिरी बहाल करून पेशव्यांनी कोणत्याही रक्तपाताविना, मुत्सुद्देगिरीनं हा किल्ला पेशवाईच्या अमलखाली आणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. कालांतराने ब्रिटिशांनी पेशव्यांकडून हा किल्ला हस्तगत केला. किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती जनरल ऑर्थर वेलस्ली याने खंदकाशेजारील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ या ठिकाणी चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत.
सन १७६७ मध्ये सदाशिवभाऊ (तोतया), १७७६मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते यांना येथे कैदेत ठेवण्यात आले होते. राघोबादादांचे अधिकारी चिंतो विठ्ठल रायरीकर, नाना फडणविस, मोरोबा दादा, िशद्यांचे दिवाण बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भागिरथीबाई िशदे यांना याच किल्ल्यात तुरुंगवास घडला. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांनी जर्मन कैद्यांनाही याच किल्ल्यात ठेवलं होतं.
इंग्रज राजवटीच्या विरोधात चलेजाव आंदोलनाचं लोण १९४२ साली देशभर पसरल्यानंतर आंदोलनाचे नेते पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोिवद वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, डॉ. सय्यद महेबुब, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, अरुणा असफअली, डॉ. पी. सी. भोज, आचार्य शंकरराव देव आदी नेत्यांना या किल्ल्यात डांबण्यात आले होते. बंदिवासात असताना पंडित नेहरू यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला. अबु कलाम आझाद यांनी ‘गुबारे खातीर’ या ग्रंथाचे लेखन याच किल्ल्यात केले. चौथ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यूही याच किल्ल्यात झाला. ब्रिटिशांच्या काळात किल्ल्यात बरेच बदल झाले. किल्ल्याच्या पूर्वेला असलेला झुलता पूल १९३२ साली ब्रिटिशांनी बांधला. काडतुसे निर्मितीची प्रयोगशाळा किल्ल्यात उभारली. तिला रॉकेटरूम म्हटलं जायचं.
भारतीय स्वातंत्र्याच प्रतीक म्हणून १५ ऑगस्ट १९४७ साली दिल्लीत झेंडावंदन सुरू असतानाच या किल्ल्यावरील ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ उतरविण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य सुवर्णमहोत्सवी सोहळा याच किल्ल्यात पार पडला. भारतीय स्वातंत्र्यानंतर या किल्ल्याचं महत्त्वं जरी वाढलं तरी हा किल्ला लष्करी हद्दीत असल्यानं तिथे लष्करी कार्यालय सुरू करण्यात आलं. तेव्हापासूनच पुरातत्व खात्याचं या किल्ल्याकडे दुर्लक्ष झालं. खंदकात प्रचंड झाडी वाढली, इलाही बुरुजाकडे जाणारा पूल कोसळला. दगडी तटबंदीतून झुडपं वाढल्याने किल्ल्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला.
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास योजनेत किल्ल्याचा समावेश झाल्याने किल्ल्याच्या सुशोभीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. किल्ल्याभोवतालच्या संरक्षक िभती व कठडय़ाच काम पूर्ण झालेलं असून परिसरातील नियोजित नेहरू उद्यानाचे भूमिपजून किल्ला महोत्सवदिनी राज्यपाल के. शंकरनारायणन्, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे सभापती दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आलं. नेहरू उद्यान लवकरच आकार घेईल, त्याचबरोबर किल्ल्याच्या आत संग्रहालय, ग्रंथालय, कलादालन, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, माहितीपुस्तिका आदी सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी शासनाने ५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. किल्ल्याच्या तटबंदीजवळ खंदकात नौकानयन, सायंकाळी लेझर-शो आदी योजनाही कार्यान्वित होतील. किल्ल्यात घडलेल्या ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित ‘ध्वनिप्रकाश’ योजनेच्या सहाय्यानं माहिती देण्यासाठी संहितालेखन सुरू आहे.
यंदा पहिल्यांदाच किल्ला महोत्सव साजरा करण्यात आला. या पर्यटनस्थळाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या महानायिकांच्या बहारदार कार्यक्रमाबरोबरच शोभेच्या दारूची आतषबाजीही करण्यात आली. लवकरच ५२१ वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारा ‘कोटबाग निजाम’ ‘भुईकोट किल्ला’ आपल्यातील जुनेपण जपत, नवा साज लेवून पर्यटकांशी संवाद साधेल.अहमदनगर शहराला माझी तशी पहिलीच भेट. राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेला हा जिल्हा कसा असेल याचा विचार मनात सुरु होता. वेळ कमी असल्याने मी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांना भेट द्यायचे ठरवले. अहमदनगरचे जिल्हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका कार्यालयाला भेट दिल्यानंतर मी ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या दिशेने निघालो. हा किल्ला कसा असेल, त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, किल्ल्याची अवस्था आता कशी असेल असे असंख्य प्रश्न मनात येत होते.

किल्ल्याजवळ पोहचताच किल्याजवळील विकास कामे पाहून आनंद झाला. या किल्ल्याचे रुपांतर राष्ट्रीय स्तरावरील पर्यटन केंद्रात करण्यासाठी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. अन्बलगन यांनी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती मिळाली. किल्ल्यात प्रवेश करताच इतिहासातील अनेक आठवणी जाग्या झाल्या. स्वातंत्र्यलढयातील अनेक घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. १९४२ च्या चले जाव आंदोलनातील पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित गोविंद वल्लभ पंत, पंडित हरेकृष्ण मेहताब, आचार्य जे.बी. कृपलानी, डॉ. सय्यद महसूद, डॉ. पट्टाभी सीतारामय्या, बॅ असफ अली, डॉ. पी. सी. घोष, शंकरराव देव, आचार्य नरेंद्र देव अशा १२ राष्ट्रीय नेत्यांना १० ऑगस्ट १९४२ पासून २८ एप्रिल १९४५ या काळात ब्रिटीशांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात स्थानबध्द केले होते. स्थानबध्दतेच्या या काळात पंडित नेहरुंनी केलेला पत्रव्यवहार, त्यांच्याच हस्ताक्षरातील पत्रे येथे जतन करुन ठेवली आहेत. ती वाचतांना नेहरुजींचे सुंदर हस्ताक्षर, त्यांचे विचार, त्याचे हिंदी बरोबरच इंग्रजी आणि उर्दू भाषेतील प्रभुत्व पाहून अभिमान वाटतो.

चले जाव आंदोलनातील या सर्व नेत्यांना ज्या खोल्यांमध्ये स्थानबध्द करुन ठेवले होते त्या खोल्यांमध्ये गेल्यानंतर या नेत्यांची माहिती छायाचित्रांसह पाहिल्यावर, वाचल्यावर त्यांच्या उत्कट देशप्रेमाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या किल्ल्यातील स्थानबध्दतेच्या काळात अवघ्या ५ `महिन्यात` `डिस्कव्हरी ऑफ इंडिया ` हा प्रसिध्द ग्रंथ लिहिला होता.

किल्ल्यात पंडित नेहरुंना स्थानबध्द केलेल्या खोलीत एक कॉफीटेबल बुक ठेवले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यलढयातील अनेक प्रसंगांची तपशिलवार माहिती तसेच दूर्मिळ छायाचित्रे आहेत. या कॉफीटेबल बुकच्या मुखपृष्ठावर `Life of Nehru Fragrance that still remains `( नेहरुंचा जीवनपट- सुगंध अजून दरवळतो आहे) असे लिहिले आहे. हे वाचतांना या खोलीत स्वातंत्र्यलढयातील घटनांबरोबरच देशभक्तीचा सुगंध अजूनही दरवळत असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

१४९० मध्ये अहमद निजामशाहने निर्माण केलेला हा किल्ला स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असून जमिनीवर बांधलेला एकमेव किल्ला आहे. तेव्हा या भुईकोट किल्ल्याला आपण सर्वानी जरुर भेट दिली पाहिजे..

संकलन- देवीप्रसाद अय्यंगार, अहमदनगर 

3/Post a Comment/Comments

 1. Wow nice snaps.....you also get the various fun places in pench.Pench is a beautiful resort.It is famous for its tracking.For more details visit pench resorts

  ReplyDelete
 2. अभिनव उपक्रमासाठी ञिवार अभिनंदन मिञा. परंतु किल्लाआणि हुतात्मा करवीर छञपती चौथे शिवाजी महाराज या दोन लेखात खूपच चुका आहेत,,.इतिहासाचे आकलन कमी पडते..,

  ReplyDelete
 3. आता मिळवा मोफत महाराष्ट्रातील व भारतातील सरकारी व खासगी नौकरी ची माहिती मोफत अधिक माहिती साठी भेट द्या.
  Naukri Kendra | नौकरी केंद्र

  ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post